Wednesday, 23 January 2019

विलासराव... मातीतला नेता...

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

महाराष्ट्राचे लोकनेते, मराठवाड्याचे सुपुत्र विलासराव दगडोजीराव देशमुख यांनी बाभळगावचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होतं...हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव यामुळे चाहत्यांचा त्यांच्याभोवती नेहमीच गराडा होता... ते नेहमी लोकांमध्ये रमायचे...

युवक काँग्रेस नेते, तत्‍कालिन एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समिती उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास करत ते 1980 मध्‍ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या 2 वर्षात त्यांच्याकडे मंत्रिपद होतं. 1995 ला शिवाजीराव लव्हेकर यांच्याकडून पराभव झाल्यानंतर 1999 ला पुन्हा विलासराव 95 हजार मतांच्या फरकाने निवडून आले. ऑक्टोबर,१९९९ ते जानेवारी, २००३ मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म त्यांनी भुषवली. तर २००४ ला ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. विलासरावांनी शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार पाहिला. नंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिपदाच्या खुर्चीत जाऊन ते बसले.

राजकारणापलीकडे मैत्री जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीत आणि राजकीय वाटचालीत अनेक सारख्या गोष्टी पाहायला मिळतात. दोघांनीही सामान्य कुटुंबातून येऊन राज्य व देशाच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. दोघेही लोकनेते होते. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची मैत्री राहिली. 1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले. त्यांची मैत्री दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांना खटकायची; पण दोघांनीही याची कधीच परवा केली नाही. उलट जाहीर कार्यक्रमातून राजकारणापलीकडे जाऊन आम्ही दोघे किती चांगले मित्र आहोत हेच ते सांगायचे. हे सांगायलाही धाडस लागतं असं ते म्हणायचे. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकदा दोघेजण एकत्र यायचे आणि एकमेकांच्या फिरक्या घ्यायचे.

विलासरावांची खासियत म्हणजे त्यांचे भाषण... ते ऐकायला राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण यायचे. विलासरावांचे मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व होते. ते बोलताना आत्मविश्वासाने बोलत असत. भाषणातून विलासराव सगळ्यांना जिंकून घेत असत. विलासरावांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या विषयाला हात घालायचे त्याचा परिपूर्ण अभ्यास ते करायचे... बोलताना अनेकदा त्याचा संदर्भ लागायचा...त्यांचं बोलणं अनुभवातुन यायचं. त्यामुळे ते उस्फुर्त असायचं...

१९९३ च्या भूकंपाच्या वेळी त्यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली तेव्हाच ते अतिशय उत्तम प्रशासक असल्याचे आपल्याला अनुभवास आले. गडचिरोली जिल्हय़ातील एका आदिवासी कुटुंबातील मुलासाठी नियम डावलून त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. कॅगच्या अहवालात त्याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली, तेव्हा आपण ती फाइल मागवून घेतली. त्यावर विलासरावांनी लिहिले होते, नियम डावलून मी आदिवासी कुटुंबीयाच्या मुलास मदत करण्याचा निर्णय घेतो आहे. कायदेशीर अडचण येत असेल तर त्यासंबंधीची जबाबदारी माझी असेल, असे त्यांनी फाइलवर लिहून ठेवले होते. त्यातूनच त्यांची सामान्य माणसाला मदत करण्याची दृष्टी लक्षात येते.

विलासराव देशमुखांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक संकटांवर मात करत प्रशासनावर आपली मजबूत पकड असल्याचं वेळोवेळी सिद्ध केलेलं. त्यांची स्मृती आजच्या तरुण पिढीला राजकारणात सतत प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही... 2012 ला विलासराव अनंतात विलिन झाले...पण आपल्या कर्तृत्वाची छाप मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर ते कायमचीच सोडून गेलेत...

- शैलजा शशिकांत जोगल

@jogalshailaja

loading...