الثلاثاء، 22 كانون2/يناير 2019

राहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक

تقييم المستخدم: 5 / 5

تفعيل النجومتفعيل النجومتفعيل النجومتفعيل النجومتفعيل النجوم
 

काही दिवसांपुर्वीच राज्यसभा निवडणूक असताना भाजपने साम दाम दंड भेद निती वापरून काँग्रेसचे काही आमदार फोडल्याचा आरोप झाला.. आर्थिक आणि इतर अनेक बाजूंनी बाहुबली असलेल्या काँग्रेसचे नेते बलवंतसिंह राजपूत यांना काँग्रेसच्याच अहमद पटेलांविरोधात उभं केलं पण, या निवडणूकीत भाजप पक्ष तोंडावर आपटला आणि अहमद पटेल विजयी झाले पण हा पराभव अमित शाहांच्या जिव्हारी लागला. गुजरात काँग्रेसचा सर्वात मोठा चेहरा असणाऱ्या शंकरसिंह वाघेलांनी काही आमदारांसोबत पक्ष सोडला त्यामुळे गुजरात काँग्रेसकडे चेहरा नाहीये, पक्षात ताटातुट झालीये. पक्षसंघटना मजबूत नाहीये. सत्तेपासून दीर्घकाळ दूर असल्यामुळे कार्यकर्ता मरगळलेला आहे. पण, आता राहुल गांधी या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचं काम यशस्वीपणे करतायत. अत्यंत चिवटपणे राहुल गांधी गुजरातच्या रणभूमीवर पाय घट्ट रोवून उभे आहेत. सामान्यांमध्ये जातायत त्यांच्या प्रश्नांवर बोलतायत, सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तम हिंदी बोलून शब्दांची कोटी करुन टीका करायलाही त्यांना जमायला लागलंय.

 

काँग्रेसचा "अटॅकिंग" मोड

यापुर्वी आरोप भाजपकडून व्हायचे आणि उत्तर काँग्रेसला द्याव लागायचं म्हणजे काँग्रेस इतके दिवस फक्त डिफेन्सीव मोडला होती. पण, आता राहुल गांधीकडून सातत्याने भाजपवर आरोप होतायत आणि उत्तर देण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांना पुढे यावं लागतंय. म्हणजे काँग्रेस अटॅकिंग मोडला आली असं म्हणता येईल. पप्पु म्हणून राहुल गांधींना हिणवणाऱ्यांना नेत्यांना राहुल गांधींच्या आरोपांमुळे घाम फुटतोय. राहुल गांधींना आता हलक्यात घेऊन चालणार नाही हे भाजपनेत्यांना कळून चुकलय.

 

राहुल गांधी आणि सॉफ्ट हिंदुत्व

आक्रमक हिंदुत्ववाची कार्यशाळा म्हणून ओळख असलेल्या गुजरातमध्ये राहुल गांधींनी वेगवेगळ्या समाजाची स्थानिक दैवतं असणाऱ्या मंदिरांना भेट देऊन हिंदुत्वाचं सॉफ्ट कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलाय. उत्तर भारतात जसं रामाचं महत्व आहे तसं गुजरातमध्ये श्रीकृष्णाचं महत्व आहे. श्रीकृष्ण गुजरातींच्या जगण्याचा भाग आहे. म्हणून राहुल गांधीनी द्वारकाधिश मंदिरात कृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर  गुजरात दौऱ्याला सुरुवात केली.  चौटिला मंदिरात त्यांनी तब्बल 1000 पायऱ्या चढत जावून चामुंडा देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर लेवा पटेल समाजाची देवी मानल्या जाणाऱ्या खोडियार माता मंदिरात ते गेले,त्यानंतर दलितांना ज्या मंदिरात मानाचं स्थान आहे त्या कागवाडच्या मंदिरात सुद्धा राहुल गांधी गेले. खेडा जिल्ह्यातल्या 200 वर्ष जुन्या फागवेल मंदिराला सुद्धा राहुल गांधींनी भेट दिली. विशेष म्हणजे हे तेच मंदिर आहे जिथून नरेंद्र मोदींनी 2002च्या गुजरात विधानसभा निवडणूसाठीचा गौरव यात्रा काढून प्रचार सुरु केला होता.  तेव्हा काँग्रेसच्या शंकरसिंह वाघेलांच्या एका यात्रेचा समारोप याच मंदिरात गौरव यात्रेच्या काही दिवसांपुर्वी झाला होता. तेव्हा जिथे काँग्रेसचा अंत होतो तिथेच भाजपच्या कामांची सुरुवात होते असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. आता मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत राहुल गांधींनीही या मंदिराला भेट देऊन भाथीजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि किर्तनामध्ये देखील सहभाग घेतला. अर्थात भाथीजी महाराजांच्या मंदिराचं राजकिय दृष्ट्या खुप महत्व आहे कारण आसपास मोठ्या संख्येने असणारा ओबीसी समुदाय हा महाराजांना खुप मानतो. त्यामुळे ओबीसी समाजाचं हे एक महत्वाचं धार्मिक स्थान आहे. प्रत्येक मंदिराला भेट देण्यामागे सुद्धा एकेका समुहाला राजकिय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. खुप विचारपुर्वक ह्या भेटी देण्यात आल्या. तसच गोशाळेला देखील राहुल गांधींनी भेट दिली.

 

विशेष म्हणजे मंदिरात भस्म किंवा टिळा लावला असेल तर कपाळावरचा टिळा तसाच ठेवून राहुल गांधी लोकांना साद घालण्याचा प्रयत्न करतायत. जसं की इंदिरा गांधी गळ्यात रुद्राक्षाची माळ घालायच्या किंवा मोदी आत्ताही गळ्यात माळा आणि डोक्यावर पुजाऱ्यानी लावलेला लेप तसाच ठेवत माध्यमांना सामोरं जातात अगदी तसच एरवी मुल्ला मौलवींची गळाभेट, दर्ग्यावर चादर चढवणं, इफ्तार पार्टी आणि ख्रिस्ती धर्मगुरुंच्या भेटीचे फोटो काढण्यातच धन्यता माननाऱ्या काँग्रेसकडून राहुल गांधींचे मंदिरातले फोटो सोशल मीडियावर धडाधड अपलोड केले जातायत. राहुलना धार्मिक हिंदु दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अर्थात भगवा आणि हिंदु दहशतवाद म्हणणाऱ्या राहुल गांधींना हिंदुंविषयी प्रेम वाटण्याचं कारण वेगळं आहे.

2014 च्या लोकसभा पराभवानंतर समिक्षेसाठी अँटनी समिती नेमली होती. यात काँग्रेसची हिंदुविरोधी छबी  आणि मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा आरोप ही पराभवाची कारणं असल्याचं अँटनी समितीच्या अहवालात म्हटलंय..त्यामुळेच राहुल गांधींना आता मंदिराच्या पायऱ्या चढाव्या लागतायत.

 

भाजपचा पराभव झाला तर...

गुजरात विधानसभा निवडणूक खुप महत्वाची आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे दोघंही गुजरातमधले आहेत दोघांचीही कर्मभूमी आणि जन्मभूमी गुजरात आहे. दोघांचंही राजकीय नेतृत्व गुजरातमध्येच तयार झालं. हिंदुत्वाच्या यशस्वी आणि दिर्घकाळ सत्तेत टिकवणाऱ्या मोड्युलचे दोघंही जन्मदाते आहेत. त्यामुळे सगळी ताकत लावून गुजरात भाजपकडे ठेवण्याचं त्यांच्यापुढे आव्हान आहे.

मोदींसारखा चेहरा हा गुजरातमुळेच भाजपला मिळाला. अमित शहांसारखं निवडणूकांकडे प्रोफेशनली बघणारं नेतृत्व भाजपला गुजरातमुळे मिळालं. गुजरात नरेंद्र मोदी आणि अमित शाह दोघांचंही गृहराज्य आहे. त्यामुळे जर गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला तर तो फक्त भाजपचाच नसेल तर पराभव असेल नरेंद्र मोदींचा आणि अमित शहांचा. या पराभवानंतर मोदी आणि शहांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल. मोदी-शहा जोडगोळीमुळे, त्यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे अस्वस्थ असणारा मोठा गट भाजपमध्ये आहे त्याला वाचा फुटेल. हा वर्ग उघडउघडपणे आपला असंतोष जाहीर करेल. मोठ्या प्रमाणात नेत्यांचं आऊटगोईंग सुरु होईल. इनकमिंग झालेले नेते राहुल गांधींसोबत भावी राजकारणाच्या शक्यता आजमावतील. तसच बाहेरचे नेते मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे भाजपचं पारंपारिक नेतृत्व आणि कार्यकर्ताही नाराज आहे तो पक्षापासून केव्हाच दुर गेलाय. त्यामुळे जमिनीस्तरावरुन भाजप उखडली जाईल.

 

'मोदी गेले तर गुजरात जाईल'

जर भाजप पक्ष गुजरातमध्ये निवडणूक हारला तर राहुल गांधी हेच त्या विजयाचे शिल्पकार असतील आणि एक देशाचं नवं आणि उमदं नेतृत्व म्हणून देशभरातली जनता त्यांच्यावर 2019च्या लोकसभा निवडणूकीत विश्वास टाकून काँग्रेसला केंद्रात निवडून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण गुजरातमध्ये काँग्रेसचा विजय झाला तर तो राहुल गांधींचा विजय असेल आणि भाजपचा पराभव झाला तर तो मोदींचा पराभव असेल.. आणि कदाचित तिथूनच काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणाऱ्या मोदींबद्दल 'मोदीमुक्त' भाजप आणि 'मोदीमुक्त' भारत अशी घोषणा दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी गुजरातच्या बाहेर गेले तर गुजरात हातातून जाईल अशी भिती बाळासाहेब ठाकरेंनी एकदा व्यक्त केली होती....आत्ता गुजरातमध्ये भाजप सत्तेत आहे पण शेवटी राजकारण म्हणजे वेगवेगळ्या गणितांची शक्यता आणि वेगवेगळ्या शक्यतांची गणितं आहे. काहीही होवू शकतं.

 

सौरभ कोरटकर - असोसिएट प्रोड्युसर-अँकर - जय महाराष्ट्र न्यूज

loading...

Top 10 News

19 كانون2/يناير 2019

राशी भविष्य